लग्नाआधीच गर्भवती असल्याचे कळल्यावर पत्नीने पतीला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले! महिला कायद्यांचा गैरवापर झाल्याचा आरोप...
झाशी - महिला कायद्यांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे, पुरुषांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे असे बरेच दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. महिलांचे जीवन सुरक्षित असावे, सासरीही त्यांना न्याय मिळावा, छळ सहन करावा लागू नये याच उद्देशाने बनवलेल्या या कायद्याचा काही महिला स्वार्थासाठी वापर करून सासरच्यांना त्रास देत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नवरा आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात खोटे आरोप करून, स्वतःची चूक असतानाही सासरच्यांचे जीवन नरक बनवण्याच्या घटना घडत आहेत. याचेच उदाहरण म्हणजे एका महिलेने आपल्या पतीचा जीव घेतल्याची घटना!
उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील बबीना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लहर ठाकूरपूर गावातील २८ वर्षीय ब्रिजेंद्र रायकर यांनी लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांत विष प्राशन करून आत्महत्या केली. ब्रिजेंद्र यांना त्यांच्या पत्नी आणि सासूने आत्महत्येस प्रवृत्त केले असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी ब्रिजेंद्र यांचा ललितपूर येथील एका मुलीशी विवाह झाला. लग्नानंतर ब्रिजेंद्र खूप आनंदी होते, पण कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांची पत्नी या नात्यातून खुश नव्हती. काही आठवड्यांतच घरातील वातावरण बिघडू लागले.
लग्नानंतर सून आपल्या माहेरी एका तरुणाशी संबंध ठेवत होती आणि लग्नाच्या वेळी ती गर्भवती होती असे कुटुंबीयांनी सांगितले. ती आपल्या प्रियकराचे मूल गर्भात बाळगत होती, त्यामुळे तिला लग्न करायचे नव्हते असे म्हटले जाते. तरीही घरच्यांच्या दबावामुळे तिने लग्न केले. ती लग्नाआधीच गर्भवती असल्याचे नवऱ्याला आणि सासरच्यांना कळताच त्यांनी याबाबत विचारणा सुरू केली. आपले सत्य बाहेर येत असल्याचे पाहून तिने सासरच्यांना त्रास देण्यास सुरुवात केली असे सांगितले जाते. तिचे दुसऱ्या कुणाशी संबंध असल्याचे तिच्या आईला माहीत असल्याने, ही गोष्ट सासरच्यांना कळताच तिने भांडण सुरू केले.
ही गोष्ट उघडकीस आणल्यास कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याअंतर्गत नवरा आणि सासूच्या विरोधात तक्रार दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी सून आणि तिची आई वारंवार देत होत्या. यावरून घरात नेहमीच भांडणे होत होती. प्रत्येक वेळी सून कायद्याचा आधार घेऊन घरच्यांना धमकावत असे. या भांडणातून कंटाळून आणि तिने खोटी केस दाखल केली तर काय होईल या भीतीने ब्रिजेंद्र यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली! घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा केले जात आहेत.